रत्नागिरी - जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या तीन मध्यम प्रकल्पांसह 65 लघु सिंचन प्रकल्पात चांगला पाणीसाठा झाला आहे. एकूण 77 टक्के प्रकल्प काठोकाठ भरले आहेत.
गेले काही दिवस जिल्ह्यात पाऊस चांगलाच बरसत आहे. 1 जून 2020 पासून आत्तापर्यंत सरासरी 2134 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आणि येत्या चार दिवसात अधिक पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. त्यामुळेच मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात जादा 9 धरणांमध्ये 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. आजपर्यंत जिल्ह्यात 53 धरणे 100 टक्के भरली आहेत.
धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील 65 पैकी 2 धरणे 0 ते 25 टक्के भरली आहेत, तर 2 धरणे 25 ते 50 टक्के, 3 धरणे 50 ते 75 टक्के, 5 धरणे 75 ते 99 टक्के, 53 धरणे 100 टक्के भरली आहेत. मध्यम लघुपाटबंधारे प्रकल्पापैकी नातूवाडी धरण सुमारे 70.49 टक्के, गडनदी आणि अर्जुना प्रकल्प 100 टक्के भरले आहे.
दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील 57 धरणे सुरक्षित असून 8 धरणे असुरक्षित आहेत, खबरदारी म्हणून या धरणांमध्ये कमी पाणीसाठा ठेवण्यात आला आहे.