रत्नागिरी - रिफायनरी प्रकल्पावरून कोकण शक्ती महासंघाचे अध्यक्ष अशोक वालम यांनी म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांचे कौतुक केले, तर आमदार राजन साळवी यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाचा अध्यादेश रद्द करण्यासाठी शेवटच्या टप्प्यात सामंत यांनीच महत्त्वाची भूमिका मांडली, तर आमदार राजन साळवी यांचे योगदान नसल्याचे वालम म्हणाले.
राजापूर तालुक्यातील नाणार परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प अखेर रद्द झाला आहे. यामध्ये कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीने महत्वाची भूमिका पार पाडली. प्रकल्प रद्द होण्यासाठी समितीने सर्वच पक्षांना साकडे घातले होते. अखेर जनतेच्या हट्टामुळे प्रकल्प रद्द करावा लागला. शिवसेनेने शेवटच्या क्षणी महत्त्वाची भूमिका बजावली.
सुकथनकर समिती रत्नागिरीत आली होती. त्याच्या आदल्या दिवशी आमदार राजन साळवी जिल्हाधिकाऱ्यांकडे का गेले होते? त्यांनी विनाकारण माझ्यावर भाष्य करू नये. माझ्याकडे भरपूर मटेरियल आहे. त्यांच्याविषयी मी बोलणे टाळणार आहे. मात्र, माझ्याविषयी बोलणार असतील, तर त्यांचा इतिहास बाहेर काढणार असल्याचा इशाराही वालम यांनी यावेळी दिला.
रिफायनरी अध्यादेश रद्द करण्यासाठी शेवटच्या टप्प्यात सामंत यांनी महत्वाची भूमिका बजावल्याबद्दल त्यांचे आभारही वालम यांनी मानले. याउलट आमदार राजन साळवी यांनी प्रकल्प रद्द करण्यासाठी आंदोलनात उतरून कधीही मदत केली नसल्याचेही वालम यांनी यावेळी म्हटले आहे.