रत्नागिरी - शेतीपासून दूर गेलेला माणूस शेताकडे वळावा, यासाठी संगमेश्वर तालुक्यातील माखजन गावात गेली ८ वर्ष सामूहिक नांगरणीच्या स्पर्धा रंगत आहेत. ही स्पर्धा पाहण्यासाठी लोकांची खूप गर्दी होत असते. आज या स्पर्धेत ३५ सेकंदापासून ते ५० सेकंदात काहींनी आपल्या बैल जोडीच्या माध्यमातून शेतात नांगरणी केली.
शेती परवडत नसल्यामुळे कोकणातला शेतकरी सध्या शेतीपासून लांब जात आहे. त्यामुळे अनेक शेतं ओसाड आहेत. कोकणात आपली शेती लावून झाल्यावर, आपली अवजारे-बैल जोड्या घेवून दुसऱ्याच्या शेतात मदतीसाठी जाण्याची कोकणात परंपरा होती. मात्र, कालांतराने ही पंरपरा लोप पावत गेली. पण कोकणच्या संस्कृतीच हेच वैभव पुन्हा उतरवण्याचा प्रयत्न संगमेश्वर तालुक्यातील माखजन गावी करण्यात आला. गावातल्या पडिक जमिनीत एक दोन नव्हे तर तब्बल ५८ बैल जोड्यांनी सामुहिक नांगरणी केली.
स्पर्धेचे नियम
अंगावर काटा आणणारा या स्पर्धेचे नियम अगदी सोपे आणि साधे आहेत. ५०० मीटरचे शेत आखले जाते. शेताच्या तीन बाजूला रेलिंग लावली जाते आणि या रेलिंगला कमीत कमी वेळेत वळसा मारुन जो नांगरी करतो किंवा जी बैलजोडी कमीत कमी वेळात हे अंतर कापते त्याला बक्षीस दिलं जातं. ही स्पर्धा ४ ते ५ तासाहून ही नांगरणीची स्पर्धा रंगते. जी बैलजोडी या रेलिंग बाहेर जाते ती बाद होते, जी बैलजोडी झेंड्याला स्पर्श करेल ती सुद्धा बाद होते. तुफान पावसात ढोपरभर चिखलात बैलाची ही खिल्लारी जोडी लाल मातीतून धावताना अंगावर शहारे येतात. नांगरणी करणारी बैल जोडीची स्पर्धा घाटी आणि गावठी बैलात खेळली जाते. दोन्ही बैलांच्या जातीसाठी नियम सारखे असतात.
ही स्पर्धा बघण्यासाठी आजूबाजुच्या गावातील शेतकरी तसेच नागरिक येतात. बैलांच्या या नांगरणीच्या स्पर्धा पाहण्यासाठी लोकं थेट झाडावर किंवा उंचावर बसून हा बैल जोडीच्या नांगरणीचा थरार अनुभवतात. सामुहिक नांगरणाीच्या माध्यमातून शेतातल्या कष्टाचा जोर सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून शेतकरी अनुभवतो. काही शेतकरी या नांगरणीच्या स्पर्धेत २८ सेकंदात शेत नांगरतात. तर काहींची बैल जोडी थेट प्रेक्षकांमध्ये घुसते. तर काहींना नांगरणीसाठी एक मिनिटांपर्यंतचा वेळ लागतो. जी शेती १० माणसे १० दिवस खपली तरी पूर्ण होणार नाही, ती शेती अर्ध्या तासात पूर्ण नांगरणी करुन पुर्ण होते. माखजन गावाने पुन्हा नव्याने सुरु केलेली ही सामुहिक शेतीची आणि नांगरणीची परंपरा, त्याचे फायदे अनुभवण्याकरिता आता आजू बाजूच्या गावातील लोक ही या गावाच्या शेताच्या बांधावर हजेरी लावतात. या निमित्ताने गाव एकत्र येतो. त्यामुळे ही स्पर्धा पाहण्यासाठी लोकं लांबून येत असतात.