रत्नागिरी - गेले सहा महिने रत्नागिरी कोरोना महामारीशी लढा देत आहे. मनामध्ये प्रचंड अस्वस्थता, अनेक प्रश्न, घरच्यांची काळजी अशा मानसिकतेमध्ये समाज पुढे जात आहे. अशा परिस्थितीत डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय या कोरोना योद्ध्यांसोबत कोरोनाबाधित रुग्णांशी संवाद साधून त्यांना आत्मविश्वास देण्याचे काम निवृत्त शिक्षिका तेजा रविंद्र मुळ्ये या करत आहेत. यासुद्धा एक कोरोना योद्धा ठरल्या आहेत.
हेही वाचा - मुंबईच्या महापौरांची चौकशी करा, किरीट सोमैयांची पालिका आयुक्तांकडे मागणी
या संदर्भात तेजा मुळ्ये सांगतात की, रत्नागिरीतल्या आयटीआयजवळील अॅपेक्स कोविड रुग्णालयात गेले 10 दिवस मी रुग्णांच्या सेवेसाठी जात आहे. हा अनुभव विलक्षण आहे. पुतण्या डॉ. सुशील व डॉ. मीरा मुळ्ये यांनी सुरू केलेल्या या रुग्णालयात रुग्णांबरोबर संवाद साधण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. मी रोज 3 तास रुग्णालयात जाते. पीपीई कीट वापरून संवाद साधते. घाबरणार्या रुग्णांना आत्मविश्वास, औषधे, आहार, उपचार यांची माहिती दिली की चांगला परिणाम होतो असे सांगितले जाते. दोन-तीन दिवसात फरक जाणवत आहे. ‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ अशी म्हण आहे. त्यामुळे भीती बाळगू नका, समजून घ्या. घाबरलात तर हा आजार तुम्हाला कमजोर करेल. कीव करावी, भीती वाटावी असे हे रुग्ण नाहीत. उपचारांची गरज, कसे राहावे, आहार काय असावा, चालणे, व्यायाम आदी काळजी घ्यावी म्हणजे चुकून आजारी पडलात तरीही 8 दिवसात स्वतःच्या पायाने चालत आरामात घरी जाता येईल. येथे ज्येष्ठ रुग्णसुद्धा बरे होत आहेत, असे तेजा मुळ्ये यांनी सांगितले.
तेजा मुळ्ये या दररोज रुग्णालयातील साधारण 60 ते 65 रुग्णांना भेटतात. रुग्णांची चौकशी करतात, शंका असतील तर डॉक्टरांशी संवाद साधून त्या रुग्णाला समजावून सांगतात. कर्मचारी आणि रुग्णांचे नाते छान तयार होण्यासाठी मार्गदर्शन करतात. त्यामुळे रुग्णांना एकटे वाटत नाही. कोरोनापासून जीव वाचवणे म्हणजे काय ते हा आजार शिकवतो. जीव वाचला तरच पुढे सर्व सुखं उपभोगता येणार आहे. त्यामुळे काटेकोर काळजी घेतली पाहिजे, हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे, असे मुळ्ये यांनी आवर्जून सांगितले.