रत्नागिरी- नाणार रिफायनरी परत आणायचीच असा निर्धार करून हजारो रिफायनरी समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. जवळपास दोन ते अडीच हजार नागरिकांनी या मोर्चाला उरस्थिती लावली आहे. सकाळी अकरा वाजता मारुतीमंदिर परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली.
नाणार येथील रद्द झालेल्या परंतु अद्याप अन्य कोणतेही ठिकाण निश्चित न झालेल्या 'रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड' (आरआरपीसीएल) या अवाढव्य तेल शुद्धीकरण कारखान्याला परत प्रस्तावित ठिकाणी आणण्यासाठी रत्नागिरी शहर व जिल्ह्यातील विविध स्तरांवरील जनता या मोर्चात सहभागी झाली होती. राजापूरमधील स्थानिकही या मोर्चात आपल्या जमिनीचा सातबारा हाती घेऊन सहभागी झाले होते. येईल जेव्हा रिफायनरी संपून जाईल बेरोजगारी, कोकण रिफायनरी झालीच पाहिजे, कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता.
प्रकल्पाच्या समर्थनार्थ निघालेल्या या मोर्चावर रत्नागिरीतल्या माळनाका इथून पुष्पवृष्टी सुद्धा करण्यात आली. या प्रकल्पाने कोकणाचा मोठा विकास होऊ शकतो, यासाठी ही पृष्पवृष्टी प्रकल्पाला समर्थन करणाऱ्यांनी केली आहे. या मोर्चाच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन केले आहे.