रत्नागिरी - रिफायनरी समर्थकांनी ( Refinery Supporter ) आपल्या मागण्यांचे निवेदन, तसेच ग्रामपंचायतींचे ठराव उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत ( Minister Uday Samant ) यांना दिले. त्याशिवाय विविध संघटनाच्या रिफायनरी समर्थनाच्या ठरावाच्या प्रती देखील सादर करण्यात आल्या. हे सर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवा, अशी विनंती यावेळी मंत्री सामंत यांना करण्यात आली. भेटीसाठी आलेल्या समर्थकांमध्ये शिवसेनेचेही कार्यकर्ते होते. आपणाकडे देण्यात आलेले ठराव मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पर्यावरणमंत्री यांच्याकडे देणार असून समर्थकांचे म्हणणे या सर्वांपर्यंत पोहोचवणार असल्याचे, मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.
रिफायनरी प्रकल्प हा धोपेश्वर-बारसू-सोलगाव या परिसरातच व्हावा यासाठी रिफायनरी समर्थकांनी सोमवारी (दि. 4 एप्रिल) उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृह येथे भेट घेतली. यावेळी राजापूरचे आमदार राजन साळवी ( MLA Rajan Salvi ) हे देखील उपस्थित होते. दरम्यान, आपणाकडे देण्यात आलेले ठराव मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पर्यावरणमंत्री यांच्याकडे देणार असून समर्थकांचे म्हणणे या सर्वांपर्यंत पोहोचवणार असल्याचे, मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.
रिफायनरी समर्थक समन्वय समितीच्या माध्यमातून ही भेट घेण्यात आली. 57 ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या 125 गावांनी रिफायनरी प्रकल्पाला समर्थन केलेलं आहे. याशिवाय रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 75 संघटनांनी या प्रकल्पाला समर्थन दिलेले आहे. हे सर्व मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवा, अशी मागणी आपण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष महेश शिवलकर यांनी दिली.