रत्नागिरी - येत्या 8 दिवसांच्या आत ग्रंथालये सुरू होतील असे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते. दरम्यान ग्रंथालये सुरू करण्यासंदर्भात माझे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे फोनवरून बोलणे झाले आहे. या बोलण्यात सकारात्मक चर्चा झाली. येत्या आठ दिवसांच्या आत वाचनालये सुरु करण्यासंदर्भात मी त्यांना आश्वासन दिल्याचे राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत बोलताना सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील ग्रंथालये, अभ्यासिका बंद आहेत. ती पुन्हा सुरू करण्यासाठी ग्रंथालयाच्या विश्वस्तांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी उदय सामंत यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या फोनवरील चर्चेबाबत उदय सामंत म्हणाले की, राज ठाकरे यांनी ग्रंथालयाच्या शिष्ठमंडळाच्या भावना मला सांगितल्या. पुण्याच्या दौऱ्यावर असताना ग्रंथालयांचा निर्णय घेतला आहे. लवकरात लवकर ग्रंथालये सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ग्रंथालये सुरु करण्यासंदर्भात नोट पुटप करून ती मुख्य सचिवांकडे पाठवण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांशी देखील याबाबत चर्चा झालेली आहे. तसेच राज ठाकरे यांनी ज्या काही सूचना दिल्या आहेत, त्या सर्व सूचना आगोदरच त्यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत ग्रंथालयाच्या कर्मचाऱ्यांवर आणि इथे जाणाऱ्या मुलांवर अन्याय होणार नसल्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. तसेच आमची दोघांची याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून येत्या 8 दिवसांच्या आत ग्रंथालये सुरू होतील, असे उदय सामंत यावेळी म्हणाले.