रत्नागिरी- जिल्हा परिषदेमधील विषय समिती सभापतीपदाची निवडणूक आज (मंगळवारी) बिनविरोध पार पडली. यामध्ये समाजकल्याण सभापतीपदी ऋतुजा राजेश जाधव, बांधकाम आणि आरोग्य सभापतीपदी महेश उर्फ बाबू म्हाप, शिक्षण, क्रीडा आणि अर्थ सभापतीपदी सुनील मोरे, महिला आणि बालकल्याण सभापतीपदी रजनी चिंगळे यांची बिनविरोध निवड झाली.
हेही वाचा- शाहीन बाग सीएए आंदोलन: सरकार आणि पोलिसांनी कायद्यानुसार कारवाई करावी
रत्नागिरी जिल्हापरिषदेच्या विषय समिती सभापतीपदासाठी आज निवडणूक घेण्यात आली. मंगळवारी दुपारी बारा वाजता शिवसेनेच्या चार सदस्यांनी उमेदवारी अर्ज भरले. त्यानंतर दुपारी तीन वाजता निवडणूक झाली. प्रत्येक जागेसाठी एकच अर्ज आल्यामुळे शिवसेनेचे चारही उमेदवार बिनविरोध विजयी झाले. उपाध्यक्ष महेश नाटेकर यांच्याकडे कृषी, पशुसंवर्धन आणि दुग्धशाळा समिती देण्यात आली. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख सचिन कदम, विलास चाळके, उद्योजक रवींद्र सामंत, जि. प. अध्यक्ष रोहन बने, उपाध्यक्ष महेश नाटेकर, गटनेते उदय बने, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्हा परिषदेत शिवसेनेचे 39 सदस्य आहेत. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 10 सदस्य आहेत. त्यामुळे सभापती निवडीत अपेक्षेप्रमाणे रत्नागिरीचा वरचष्मा राहिला आहे. रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले उपजिल्हाप्रमुख महेश उर्फ बाबू म्हाप आणि वाटद गटातून विजयी झालेल्या ऋतुजा जाधव यांना सभापतीपदाचा बहुमान मिळाला. शिक्षण सभापती सुनील मोरे हे खेड तालुक्यातील भोस्ते गटातून आणि महिला आणि बालकल्याण सभापती रजनी चिंगळे संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे गटातून विजयी झाल्या आहेत.