रत्नागिरी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर संचारबंदी आहे. एका ठिकाणी पाच पेक्षा अधिक लोकं जमण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. मात्र असं असतानाही या संचारबंदीचा भंग करत गुहागरमध्ये एका विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या प्रकरणी दोन्ही यजमानांसह चौघांविरोधात गुहागर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गुहागर तालुक्यातील भातगाव कोसबीवाडी येथे शुक्रवारी हा विवाह सोहळा पार पाडला. या सोहळ्याला १०० ते १५० लोक हजर होते. गुहागर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार , उपनिरीक्षक किरणकुमार कदम सहकाऱ्यांसह विवाहस्थळी दाखल झाले. संचारबंदी व जमावबंदी लागू असतानाही त्याचा भंग केल्याने काजुर्ती येथील भटजी संजय जोशी, वधू पिता प्रकाश धोंडू हारेकर, भातगावचे पोलीस पाटील सिद्धोधन गणपत मोहिते, वराचे पिता अनंत पांडुरंग वेले यांच्यावर भा . दं . वि . सं . कलम १८८ , २६९ , २७० , महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ ( १ ) ( ३ ) / १३५ , साथ रोग अधिनियम १८९७ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.