रत्नागिरी - नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत अतिशय स्पष्ट भूमिका आहे. शासनाने वारंवार सांगितले की, नाणार प्रकल्प रद्द झाला आहे. त्यामुळे दुसरा विचार करण्याची गरज नाही, असे पालकमंत्री अनिल परब यांनी आज (शनिवारी) स्पष्ट केले. दरम्यान, या प्रकल्पाला विरोध मावळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे, याबाबत विचारले असता, 'याच्यावर भविष्यात चर्चा केली जाईल. मात्र, शिवसेनेची भूमिका किंवा राज्य सरकारची आजची भूमिका आहे की 'नाणार सध्या नाहीच'. दरम्यान, अनेक शिवसैनिकही या प्रकल्पाच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत. याबाबत ते म्हणाले, 'तो नंतरचा विषय आहे. कोणाची मागणी आहे? काय मागणी, ते नंतर पाहिले जाईल. मात्र, 'सध्या नाणार नाही,' ही आजची भूमिका कायम आहे,' असेही परब यांनी यावेळी स्पष्ट केले.
आता येणाऱ्यांना टेस्ट आवश्यकच - परब
गणेशोत्सवासाठी मी स्वतः कोकण रेल्वेची मागणी केली होती. कोरोना नियमावलीप्रमाणे 12 तारखेनंतर येणाऱ्या प्रत्येक चाकरमान्यांची स्वॅब चाचणी आवश्यक असणार आहे. ट्रेनमध्ये सुद्धाप्रवास करताना स्वॅब टेस्ट आवश्यक असल्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांना जनतेची सहानुभूती - परब
मुख्यमंत्र्यांच्या कामावर आक्षेप घेणाऱ्या विरोधी पक्षाचा मंत्री अनिल परब यांनी चांगलाच समाचार घेतला. मुख्यमंत्री आपले काम करत आहेत. मुख्यमंत्र्यांना लोकांची सहानुभूती मिळाली आहे. आमची नाळ जनतेशी जोडली गेली आहे. त्यामुळे दुसऱ्यांच्या सहानुभूतीची मुख्यमंत्र्यांना आवश्यकता नाही, असा टोलाही पालकमंत्री अनिल परब यांनी विरोधकांना लगावला.