रत्नागिरी - एल.ई.डी. व फास्टर नौकांच्या अवैध मासेमारीविरोधात दापोली, मंडणगड, गुहागर मच्छिमार संघर्ष समितीने दापोली तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केलं आहे. गेले चार दिवस हे उपोषण सुरू आहे. दापोली, मंडणगड, गुहागर मच्छिमार संघर्ष समितीला फास्टर आणि पर्ससीन नौकाच्या होणाऱ्या अतिक्रमणामुळे उपोषण करण्याची वेळ आल्याने संघटनेच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पारंपरीक मच्छिमारांवर उपासमारीची वेळ
महाराष्ट्र राज्यातील सागरी हद्दीमध्ये परप्रांतीय हायस्पीड बोटी व एलईडी लाईटव्दारे मासेमारी करण्यात येत आहे. या अनियंत्रीत बेकायदेशीर मासेमारीमुळे सागरी मत्स्योत्पादनात कमालीची घट झाली आहे. परिणामी गेली ३ वर्षे कोकण किनारपट्टीवर मत्स्यदुष्काळ निर्माण झाला आहे. बेकायदेशीर मासेमारी रोखण्याबाबत शासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे दिवसेंदिवस हायस्पीड बोटी व एलईडी बोटींची संख्या वाढत आहे. त्याची झळ पारंपारीक मच्छिमारांना बसली असून, सध्या कोकण किनारपट्टीवर साधारपणे ८० टक्के नौका बंदरामध्ये व खाडयांमध्ये नांगरुन ठेवल्या आहेत. त्यामुळे पारंपारीक मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली असल्याचं मच्छीमाराचं म्हणणं आहे.
अवैध मासेमारीबाबत शासन डोळेझाक करत असल्याचा आरोप
ही अवैध मासेमारी गेल्या चार ते पाच वर्षांपासून सुरू आहे. मच्छिमार संघटनांकडून व मच्छिमारी सहकारी संस्थांकडून आंदोलने, निवेदने अशा सनदशीर मार्गाने ही मासेमारी थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र शासनाकडून आमच्या मागणी कडे दुर्लक्ष केले जात असून, अवैध मासेमारी सुरूच आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील पारंपरीक मच्छिमार समाजाचा उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तरी बेकायदेशीर मासेमारी तात्काळ थांबवावी व संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी दापोली, मंडणगड, गुहागर, मच्छिमार संघर्ष समितीच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू केल्याची माहिती यावेळी उपोषकर्त्यांनी दिली.
उपोषण सुरूच राहणार
दरम्यान या उपोषणाला माजी आमदार संजय कदम यांनी भेट दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे सांगितले. तसेच प्रशासनातर्फे तहसीलदार वैशाली पाटील यांनीही उपोषणस्थळी भेट देऊन, उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र जोपर्यंत अवैध मासेमारी थांबणार नाही, तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिली.
हेही वाचा - महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाण्यासाठी कोरोना चाचणी बंधनकारक; मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तपासणी