रत्नागिरी - वर्षभरापूर्वी मृत्यू झालेल्या ग्रामस्थांच्या नावाचे दाखले देत, मुंबईस्थित नागरिकांना आपल्या गावी आणल्याचा ठपका असलेल्या रायपाटण सरपंचांची सखोल चौकशी करण्याचे आदेश जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. यामध्ये सरपंच दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना संसर्गाचा कालावधीत नियम भंग करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशाराही उदय सामंत यांनी दिला आहे.
लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर जिल्ह्यांच्या सीमा बंद झाल्या होत्या. मात्र रायपाटण सरपंचांनी मुंबईत असणाऱ्या एका चाकरमान्याच्या आईचे गेल्यावर्षी निधन झाले. मात्र, त्यांचा आता मृत्यू झाला असून ते अंत्यविधीला गावी येत आहेत, असा खोटा दाखला दिला. त्या दाखल्याच्या आधारे तब्बल 9 जण रायपाटण येथे दाखल झाले. मात्र, प्रत्यक्षात संबंधित व्यक्तीच्या आईचा वर्षभरापूर्वीच मृत्यू झाला होता. त्यामुळे आपल्या सरपंचपदाचा गैरवापर करून खोटे दाखले देत अनेकांना मुंबईहून गावी बोलावून घेतल्यामुळे भयभीत झालेल्या काही ग्रामस्थांनी गृहमंत्री अनिल देशमुख, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याकडेही याबाबत तक्रार केली आहे.
खोटे दाखले देणाऱ्या सरपंचाचे सरपंच पद रद्द करण्यात यावे, तसेच केलेल्या गैरकामांची चौकशी करून सरपंचांवर योग्य कलमांनुसार गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली होती. दरम्यान याबाबत रायपाटण सरपंचांची सखोल चौकशी करण्याचे आदेश जि. प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.