रत्नागिरी - प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आणि साधारण 42 बालकांना कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर काढणारे डॉ. दिलीप मोरे यांचे आज (गुरुवार) पहाटे निधन झाले. गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून ओळख असणाऱ्या आणी सेवानिवृत्तीनंतरही सेवा बजावत बजावणाऱ्या डॉ. दिलीप मोरे यांना काही दिवसांपूर्वीच कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. तेव्हापासून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज पहाटे त्यांची प्राणज्योत माळवली. ही बातमी कानी पडताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
'माझा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आमच्या घरांच्याची देखील कोरोना टेस्ट करण्यात आली. माझ्या 6 वर्षाच्या मुलीचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, देवदूत डॉ. दिलीप मोरे हे कोरोना पॉझिटिव्ह मुलांवर उपचार करत असल्याने मला कोणतीही चिंता नव्हती. जिल्हा रुग्णालयातच माझ्या मुलीने कोरोनावर मात केली. यात डॉ. दिलीप मोरे यांचे योगदान मोठे आहे. पण डॉ. दिलीप मोरे यांनी रुग्णसेवा करताना स्वतःच्या जीवाची पर्वा कधी केली नाही. त्यामुळेच कदाचित आजचा दिवस आपल्याला पहावा लागला. त्यांच्या जाण्याने वैद्यकीय क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. प्रतीक झिमण यांनी डॉ. दिलीप मोरे यांच्या निधनानंतर व्यक्त केली आहे.
हेही वाचा - नागपूरमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू
डॉ. दिलीप मोरे 11 फेब्रुवारी 1981 रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाले. जवळपास 32 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मार्च 2013 मध्ये ते सेवानिवृत्त झाले. या कालावधीत बालरोगतज्ज्ञ म्हणून आपल्या कार्याचा त्यांनी वेगळा ठसा उमटवला होता. शिवाय जिल्हा रुग्णालयातील बालविभाग हा त्यांच्यामुळेच ओळखला जायचा. लहान मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम ते या विभागात राबवायचे. डॉ मोरेंनी आपल्या मुलाला तपासले आहे ना, मग आपले मुल हमखास बरे होणार हा विश्वास डॉ. मोरेंकडे आजारी मुलांना घेऊन येणाऱ्या पालकांना असायचा. रुग्णसेवा करत असताना त्यांनी सामाजिक बांधिलकीही जपली होती. समाजातील प्रत्येक घटकाबरोबर ते मिळून मिसळून वागत. रुग्णसेवा करताना त्यांनी कधी भेदभाव केला नाही.
रुग्ण सेवेचा वसा घेतलेले डॉ. दिलीप मोरे हे सेवानिवृत्तीनंतरही केवळ गोरगरिबांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांंतर्गत जिल्हा शासकीय रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ म्हणून रुग्णसेवा करत होते. त्याचबरोबर शहरात गोरगरिबांसाठी दवाखानाही चालवत होते. मात्र, त्यांनी कधीही कोणाकडूनही उपचारासाठी भरमसाठ फी घेतली नाही. तपासणीची फी देखील ते घ्यायचे नाहीत. शांत, संयमी, मनमिळाऊ, समजावून सांगणारे अशी त्यांची वेगळी ओळख होती. आशा डॉ. दिलीप मोरे यांनी आपलं संपूर्ण आयुष्य जिल्हा शासकीय रुग्णालयात घालवले. जवळपास 40 वर्ष त्यांनी जिल्हा रुग्णालयात सेवा बजावली.
हेही वाचा - रुग्णवाहिकेच्या कमतरतेमुळे आजही होत आहेत रुग्णांचे हाल, रुग्णांची लूट सुरूच
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रत्नागिरी जिल्ह्यातही वाढू लागला त्यातच लहान मुलांना देखील कोरोनाची लागण होऊ लागली. काही नवजात बालकं देखील कोरोनाच्या विळख्यात सापडली होती. आशा चिमुकल्यांवर डॉ. दिलीप मोरे यांनी उपचार केले. वयाची साठी पार केलेली असतानाही केवळ या बालकांसाठी ते रूग्णालयात येत होते. या सर्व बालकांची आपल्या कुटुंबाप्रमाणे काळजी घेत असत. आशा या देवदूताने कोरोना झालेल्या 42 बालकांना कोरोनाच्या विळख्यातून बाहेर काढले. मात्र ही सेवा बजावत असतानाच अखेर त्यांनाही कोरोनाने गाठले.
गेले काही दिवस जिल्हा शासकीय रुग्णालयात म्हणजेच सध्याच्या कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच आज (गुरुवार) पहाटे त्यांची प्राणज्योत माळवली. त्यांची ही अकाली एक्झिट रत्नागिरीकरांच्या मनाला चटका लावून गेली. ज्या बालकांना त्यांनी कोरोनामुक्त केले, त्या बालकांचे कुटुंबीयही हळहळ व्यक्त करत होते. असा अद्वितीय एक कोरोना योद्धा गमावल्याने रत्नागिरीकरांची मात्र मोठी हानी झाली आहे.