रत्नागिरी- जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 700 च्या पुढे गेली आहे. रविवारी आणखी 14 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 710 झाली आहे. जिल्ह्यात सध्या विविध रुग्णालयात 207 रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या 27 वर पोहोचली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यात आणखी 14 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 14 मधील 6 जणांना जिल्हा कोव्हिड रुग्णालयात, 6 जणांना उपजिल्हा रुग्णालय, कामथे येथे आणि दोघांना उपजिल्हा रुग्णालय कळबणी येथे दाखल करण्यात आले आहे.
आणखी एकाचा मृत्यू
दरम्यान, कोरोनामुळे रविवारी आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. दापोली तालुक्यातील दाभोळ येथील एका 60 वर्षीय रुग्णाचा झाला आहे. या रुग्णाला मधुमेह, ब्लड प्रेशर तसेच एकदा हृदय विकारचा झटका येऊन गेला होता. रुग्णाचा मृत्यू रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी झाला होता. त्याचे स्वॅब तपासणी पाठविण्यात आले होते. स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्हयात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 27 झाली आहे.