रत्नागिरी - रिफायनरी प्रकल्पाला सध्या स्थानिक पातळीवर समर्थन वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ आता राजापुरातील व्यापारी संघटना पुढे आली आहे. हा प्रकल्प राजापूर तालुक्यात व्हावा, अशी मागणी राजापूर तालुका व्यापारी संघाने करत रिफायनरी प्रकल्पाला समर्थन देणारे निवेदन शासनाला सादर केले. राजापूरचे नायब तहसीलदार अशोक शेळके यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
राजापूर तालुका व शहराच्या सर्वांगीण विकासासाठी रिफायनरीसारख्या मोठ्या प्रकल्पाची आवश्यकता आहे. प्रकल्पामुळे व्यापारामध्ये वाढ होतानाच येथील तरुणांच्या रोजगाराचाही प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे आमचा रिफायनरी प्रकल्पाला पाठिंबा असल्याचे व्यापारी संघटनेने म्हटले आहे.
यावेळी तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, संघाचे सचिव व माजी नगरसेवक विलास पेडणेकर , खजिनदार व राजापूर अर्बन बँकेचे माजी संचालक दिनानाथ कोळवणकर , अर्बन बँक संचालक रज्जाक डोसानी , संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र नवाळे , विवेक गादीकर , रमेश पोकळे , कमाल मापारी यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते .
रिफायनरीला समर्थन करणाऱ्यांची संख्या वाढताना पहायला मिळतेय. या प्रकरणी आता सरकारकडून काय भूमिका घेतली जाते, यावर सर्वांच्या नजरा आहेत.