रत्नागिरी - रेल्वेच्या बेसीनमधील पाणी बाटलीत भरून सील लावून विकणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याला न्यायालयाने कारावासाची शिक्षा सुनावत दंडात्मक कारवाई केली. या कर्मचाऱ्याला १० दिवसांचा साधा कारावास आणि 1500 रुपये दंडाची शिक्षी ठोठावली आहे. विशेष म्हणजे 24 तासांच्या आत न्यायालयाने या आरोपीला शिक्षा सुनावली आहे.
हेही वाचा - पुण्यात गिझरमधील वायूमुळे खासगी शिकवणी घेणाऱ्या तरुणाचा गुदमरून मृत्यू
बुधवारी जामनगर एक्स्प्रेसमध्ये रेल्वेतील कंत्राटी कर्मचारी रेल्वेतील बेसीनमधील पाणी बाटलीत भरून ती बाटली सीलबंद करून विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार रेल्वे प्रवाशांच्या सतर्कतेमुळे समोर आला होता. त्यानंतर रेल्वे प्रवाशांनी याची माहिती रेल्वेतील टीसीला दिली. टीसीने याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली आणि रेल्वे पोलिसांनी तातडीने या कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले. रवींद्र व्यास असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. दरम्यान, न्यायालयासमोर हजर केले असता रत्नागिरी सत्र न्यायालयाने त्याला 10 दिवसांचा साधा कारावास आणि 1500 रुपये दंड ठोठावला आहे. विशेष म्हणजे या घटनेमुळे रेल्वेत मिळणाऱ्या बाटली बंद पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र, न्यायालयाने सुनावलेल्या या शिक्षेमुळे अशा पद्धतीने पाणी विकणाऱ्यांना लगाम बसणार आहे.
हेही वाचा - वर्धा बंद : आरोपीला जिवंत जाळा, संतप्त आंदोलकांची मागणी