रत्नागिरी - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या मोठ्या प्रमाणात चाकरमानी जिल्ह्यात दाखल होत आहेत. त्यातच ई-पास आणि क्वारंटाईनबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या. मात्र, जिल्ह्यात कोठूणही येणाऱ्या व्यक्तिला 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी बंधनकारक, असून कोणालाही विनापास जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नसल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. 22 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरूवात होत आहे. त्यासाठी सध्या चाकरमान्यांनी आपल्या गावची वाट धरली आहे. त्यातच ई-पास आणि क्वारंटाईन कालावधीबाबत चर्चा सुरू आहेत. मात्र, 'जिल्ह्यात कोणालाही विनापास प्रवेश दिला जाणार नाही, याबाबत काही गैरसमज निर्माण झाले होते. मात्र, आपण पुन्हा एकदा स्पष्ट करत आहोत की, कोणालाही विनापरवाना, विनापास जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नसून, ई-पास आवश्यकच असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे काही नियम आहेत. तेच सध्या कायम आहेत. त्यामुळे क्वारंटाईन कालावधी हा 14 दिवसांचाच बंधनकारक असून, 14 दिवसांचे विलगीकरण जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांना पाळावेच लागणार आहे. कोरोनाच्या या परिस्थितीत हे सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी स्पष्ट केलं आहे.