रत्नागिरी - नवीन सुधारित मच्छिमारी कायद्याविरोधात (Marine Fisheries Regulation) रत्नागिरी जिल्ह्यातील पर्ससीननेटधारक मच्छिमार आक्रमक (Purse Seining Fishing) झाले आहेत. साखळी उपोषणाचा आज 23 वा दिवस असून, आज बोटींवर काळे झेंडे लावत मच्छिमारांनी नवीन सुधारित मच्छिमारी कायदा आणि सरकारचा निषेध केला. येत्या काही दिवसांत हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा मिरकरवाडा जेटीवर एकत्र येत मच्छिमारांनी दिला आहे.
सरकारला इशारा -
मासेमारी कायद्यात बदल करून त्यात सुधारणा करून राज्य शासनाने नवीन सुधारित कायदा पारित केला. हा कायदा कोकणातील मच्छीमारांच्या हिताचा नाही, असे पर्ससीन नेट मच्छिमारांचे म्हणणे आहे. या कायद्यातील जाचक अटी शिथिल करण्यासाठी 3 जानेवारीपासून रत्नागिरी जिल्हा व तालुका पर्ससिननेट मच्छीमार संघटना रत्नागिरी आणि साखरीनाटे येथे साखळी उपोषणाला बसले आहेत. मात्र सरकारला अद्याप जाग येत नसल्याचं सांगत रत्नागिरीतल्या मिरकरवाडा बंदरात मच्छिमार रस्त्यावर उतरले होते. तसेच सर्वच बोटी आज बंद ठेवत बोटींवर निषेधाचे काळे झेंडे लावण्यात आले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यामध्ये महिलांचाही सहभाग लक्षणीय होता.
सरकारला जाग आली नाही तर डहाणू- पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंतचे पर्ससीननेटधारक मच्छिमार मुंबईत तीव्र आंदोलन करतील असा इशारा यावेळी मच्छिमारांकडून देण्यात आला.
हेही वाचा - सिंधुदुर्गच्या किनाऱ्यावर हजारो मत्स्यनौका विसावल्या; मच्छीमारी व्यवसाय यंदा आतबट्यात