रत्नागिरी - दिवाळीच्या सणात सुकामेव्याला मोठी मागणी असते. दिवाळीला अनेकजण भेटवस्तू म्हणून सुकामेवा देत असतात. दरम्यान, टाळेबंदी व महागाईमुळे यावर्षीही सुक्या मेव्याचे दर 10 ते 15 टक्क्यांनी वाढले आहेत. दर वाढले असले तरी बाजारात मात्र ग्राहकांची पसंती सुक्या मेव्याला असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, दिवाळीच्या तोंडावर काजू, बदाम, अंजीर, अक्रोड आदी सुक्या मेव्याच्या पदार्थांच्या भावात वाढ होते. कारण या दरम्यान विविध प्रकारच्या मिठाईची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. दिवाळी निमित्त नागरीक ऐकमेकांना मोठ्या प्रमाणात मिठाईसह सुक्या मेव्याचे बॉक्स भेट म्हणून देतात. यावर्षी दरात थोडा फरक पडल्याचे व्यापारी सांगतात.
ग्राहकांची सुक्या मेव्याला पसंती
दर वर्षी दिवाळीनिमित्त विविध कंपन्या, संस्थांकडून नजीकच्या व्यक्तींसह कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. फराळ, मिठाई तसेच विविध वापरण्यायोग्य किंवा खाण्यायोग्य वस्तू भेट म्हणून देण्यात येतात. पण, टाळेबंदी व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोषक आहार म्हणून सुकामेवा देण्याला अनेक जण प्राधान्य देत आहेत.
यामुळे वाढले सुक्या मेव्याचे दर
अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे अफगाणिस्तानातून आयात होणाऱ्या अक्रोड व अंजिरवर परिणाम झाले आहे. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत सुक्या मेव्याच्या दरामध्ये फरक पडला आहे. त्याचबरोबर इंधन दरवाढीमुळे वाहतुकीचे दरही वाढले आहेत, याचाच परिणाम होऊन सुक्या मेव्यांच्या किंमतीत 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
रत्नागिरीच्या बाजारातील दर
सुका मेवा | प्रती किलो किंमत |
बदाम | 900 ते 1 हजार 200 रुपये |
पिस्ता | दीड हजार ते 2 हजार 200 |
मनुका | 450 |
काजू | 900 ते 1 हजार 200 |
खारीक | 500 |
विक्री तेजीत
विविध कारणांमुळे सुक्या मेव्याचे दर वाढलेले आहेत. मात्र, ग्राहकांची मागणी पूर्वीप्रमाणेच असल्याने विक्रीवर कोणताही परिणाम झालेला नाही. कोरोनामुळे सुक्या मेव्याच्या मागणीत वाढ झाल्याने विक्री तेजीत सुरू असल्याचे व्यापारी अभिजित शेरे यांनी सांगितले.
हे ही वाचा - चंद्रकांतदादा हल्ली झोपेतही बोलतात, त्यांचं बोलणं जास्त मनावर घेऊ नका - जयंत पाटील