रत्नागिरी- शंभर गाड्या घेवून दौरा केल्याप्रकरणी भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांच्यावर कारवाई होणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान केले. या विधानावर आता भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. गृहमंत्री राज्याचे जबाबदार मंत्री आहेत त्यांनी असे विधान करू नये, असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी व्यक्त केले आहे.
गृहमंत्र्यांनी कारवाई जाहीर करण्याची काय आवश्यकता आहे, गृहमंत्री राज्याचे जबाबदार मंत्री आहेत. त्यांनी असे कारवाईचे विधान करू नये. कायद्यानुसार राज्य चालत असते. जिथे चुका होत असतील तिथे कारवाई होईल. पडळकरांनी शंभर गाड्या नेल्या, पण राज्यात प्रत्येक मंत्री दौरे करत आहेत. त्यांच्यासोबत पण गाड्यांचा ताफा फिरत आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी मंत्र्यांच्या दौऱ्यात किती गाड्या होत्या? मग सर्वांवर कारवाई करा. राजकीय अभिनिवेशातून गोपीचंद पडळकरांच्या मुद्यावर पडदा टाकणे आवश्यक आहे, असे दरेकर म्हणाले.