रत्नागिरी - जिल्ह्यातील पारंपरिक विरुद्ध पर्सेसीन मच्छिमारांमधील वाद पुन्हा उफाळला आहे. पारंपरिक मच्छिमारांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा रत्नागिरी जिल्ह्यातील पर्सेसीन मच्छिमार संघटनेने दिला आहे. कायद्याने आम्हाला समुद्रात १२ नाॅटिकल मेलाच्या बाहेर मच्छिमारी करण्याची परवानगी आहे. मात्र, पर्सेसीन धारकरांवर पारंपरिक मच्छिमार दबाव टाकून कारवाई करायला भाग पाडत असल्याचा आरोप पर्सेसीन मच्छिमारांनी केला आहे. पर्सेसीन मच्छिमारांवर अन्याय झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा मच्छिमार नेते नासीर वाघू यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
'ते आंदोलन म्हणजे नौटंकी'
हर्णै येथील मच्छिमारांचे आंदोलन म्हणजे नौटंकी होती. चार महिने गुजरात, गोवा, कर्नाटक येथील नौका एलईडी मासेमारी करीत होत्या. त्यावेळी आंदोलनकर्ते झोपले होते का? असा सवाल उपस्थित करत शिमगा जवळ आला की त्यांना रत्नागिरी बंदर दिसते, असा आरोपही वाघू यांनी यावेळी केला आहे.
'चुकीच्या पद्धतीने कारवाई'
प्रत्येकवेळी पर्सेसीनवर निर्बंध घातले जातात. १२ नॉटिकल बाहेर मासेमारी करण्याची परवानगी या काळात असताना देखील मासेमारी नियमांची अपुरी माहिती असलेल्या अधिकार्यांकडून चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात आहे. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करू, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला आहे.
हेही वाचा-राज्यात टाळेबंदी लावणार नाही, निर्बंध आणखी कडक केले जातील - वडेट्टीवार