रत्नागिरी - सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि 2020 या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकणात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील गणपतीपुळे, गुहागर, दापोली अशा सर्वच समुद्रकिनारी पर्यटक मोठ्या संख्येने आल्याने कोकणचा सागर किनारा हाऊसफुल्ल झाला आहे. कोकणी खाद्य, निसर्ग यांच्या साथीने नव वर्षाच्या स्वागताकरिता पर्यटकांनी खास कोकणची निवड केल्याचे पहायला मिळत आहे.
हेही वाचा- 'लाथ मारेल तिथे..., मंत्रिमंडळ विस्तारांनतर रोहित पवारांची फेसबूक पोस्ट...
कोकणचे विहंगम सौंदर्य प्रत्येकाला खुणावतेच. निळा समुद्र किनारा आणि इथले सौंदर्य अनेक पर्यटकांना आकर्षित करते. त्यामुळेच यावर्षी नववर्षांचे स्वागत कोकणात करावे याच बेताने आलेल्या पर्यटकांनी सध्या कोकण हाऊसफुल्ल झाले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच देशाच्या अनेक भागांतून पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत. परदेशी पाहुण्यांनीही समुद्र किनाऱ्यांनाच जास्त पसंती दिली आहे. त्यामुळेच समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची रेलचेल वाढली आहे.
वाँटर स्पोर्ट्स, समुद्राच्या पाण्यात भिजण्याची मज्जा सुद्धा अनेक पर्यटक घेताना दिसत आहेत. बच्चे कंपनी बरोबरच त्यांचे पालकही समुद्रकिनाऱ्यावर पाण्यात मस्त बागडताना दिसत आहेत. रत्नागिरी नजीकच्या गणपतीपुळेच्या मंदिरासमोरील किनाराही पर्यटकांनी फुलून गेला आहे. कोकणातील दूरपर्यंत पसरलेले आणि स्वच्छ समुद्र किनारे पर्यटकांना इथ आकर्षित करतात. गोवा आणि मुंबई यांच्या मध्यावर असलेल्या कोकणच्या सौंदर्याची भुरळ पर्यटकांना असते. त्यामुळे पर्यटकांची पावले आपसूकच कोकणच्या दिशेने वळताना दिसतात. दरम्यान, येणारे नवीन वर्ष सर्वांना सुखसमृद्धीचे, आनंददायी आणि भरभराटीचे जाओ, असे साकडे घालताना पर्यटक पाहायला मिळत आहेत.