रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा आज सुरू झाल्या आहेत. मात्र अनेक पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास असहमती दर्शवली आहे. जिल्ह्यात नववी ते बारावीचे 83,136 विद्यार्थी असून, जिल्ह्यातील केवळ 2 हजार 281 विद्यार्थ्यांना पालकांनी मुलांनी शाळेत येण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांविनाच शाळा भरत असल्याचे चित्र आहे.
23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार असे जाहीर झाले होते. त्यानुसार जिल्ह्यातील शाळांनी खबरदारी घेत शाळा सुरू केल्या आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत येताना मास्क अनिवार्य आहे. तसेच शाळेत प्रवेश करताना प्रत्येक विद्यार्थी तसेच शिक्षकांना हातावर सॅनिटायझर दिले जात आहे. प्रत्येकाचे तापमान तपासूनच प्रवेश दिला जातो.
रत्नागिरीत कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी असले तरीही पालकांमध्ये भीती आहे. त्यामुळे नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी संमती दिली गेली नाही. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवताना पालकांचे संमतीपत्र आवश्यक आहे. रविवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील 2 हजार 281 पालकांनीच संमतीपत्र शाळांकडे सादर केली होती.
शिर्के प्रशालेत 575 पैकी 67 जणांची सहमती
रत्नागिरीतल्या रा.भा. शिर्के प्रशालेच्या मुख्याध्यापिका जी जी गुळवणी यांनी सांगितले की, आमच्या शाळेमध्ये 9 वी ते 12 वी पर्यंतचे 575 विद्यार्थी आहेत. मात्र केवळ 67 जणांच्या पालकांनी आपल्या पाल्याला शाळेत पाठवण्यास सहमती दर्शवली आहे. बाकी सर्वांनी ऑनलाइनचा पर्याय निवडला आहे. तसेच शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था एका बेंचवर एक अशी करण्यात आलेली आहे. सरकारने जे नियम घालून दिलेले आहेत, त्या नियमांचे पालन करून शाळा सुरू केल्या असल्याचे मुख्याध्यापिका गुळवणी यांनी सांगितले.
हेही वाचा - राज्यात आजपासून शाळांची घंटा वाजली; जाणून घ्या कुठे उघडल्या शाळा, तर कुठे आहेत बंद