रत्नागिरी - सुरुवातीला मुसळधार पाऊस झाल्याने रत्नागिरीतील शेतकऱयांनी भाताची लागवड केली. मात्र, कोकणात गेल्या आठ दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे बळीराजा सध्या चिंतातूर झाला आहे. काही ठिकाणी पावसाअभावी भात लागवडीची कामे खोळंबली आहेत. तर काही ठिकाणी जी लागवड झाली आहे, त्या जमिनीलाही तडे गेले आहेत.
रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे गावात शेतीची नेमकी स्थिती काय आहे, याचा आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी...
मान्सून सुरू झाल्यानंतर सुरुवातीला काही दिवस जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला होता, काही ठिकाणी भात लावणीच्या कामाला सुरुवातही झाली होती. मात्र, सध्या पावसाने दडी मारल्याने लावणी केलेल्या शेत जमिनीला भेगा पडल्या आहेत. उगवलेल्या रोपांना पुरेसे पाणी मिळाले नाही, तर भातशेती करपण्याची भिती आहे.
पावसाने पाठ फिरवल्याचा सर्वाधिक फटका कातळावर लावलेल्या भाताला बसणार आहे. पुढील पाच दिवस पाऊस पडला नाही तर पाऊस पडला नाही तर शेतीसाठी केलेली मेहनत वाया जाणार आहे. त्यामुळे पाऊस कधी बरसणार या प्रतीक्षेत बळीराजा असलेला पहायला मिळत आहे.