रत्नागिरी - कोकणातील नुकसान पाहता सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे, असा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस यांनी आज (शुक्रवार) रत्नागिरीतील दापोली तालुक्यात केळशी येथे निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी खासदार निलेश राणे, आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रसाद लाड, गोपीचंद पडाळकर, रवींद्र पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन आदी नेते उपस्थित होते.
हेही वाचा... कोरोना काळात मंत्र्यांमध्ये भांडणे सुरू; राज्य सरकारने बंद करावा हा तमाशा - आमदार लोणीकर
निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या सर्वच राजकीय नेतेमंडळी या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. भाजप नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आज (शुक्रवार) रत्नागिरीत निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. प्रथम त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील वेळास येथे पाहणी दौरा केली. तिथे स्थानिकांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यानंतर ते केळशी, आंजर्ले, उटंबर आणि मुर्डी गावांना भेट दिली. या ठिकाणी झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली.
'अजूनही येथील लोकांना सरकारी मदत मिळाली नाही. झालेले नुकसान प्रचंड आहे. त्या तुलनेने मदत ही तुटपुंजी आहे. येथील नुकसानग्रस्त बागायती आधी साफ करणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने मदत दिली पाहिजे. तसेच येथील परिस्थितीचा योग्य विचार या सरकारने केलेला नाही. त्यामुळे हेक्टरी मदत ही अतिशय कमी आहे. गुंट्याला फक्त 500 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे ही जी काही मदत असेल, ती तुटपुंजी ठरणार आहे. खरे तर सरकारचे अस्तित्वच या ठिकाणी जमीनीवर दिसत नाह' असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसोबत बोलताना केला.
हेही वाचा... धनंजय मुंडे फायटर, लवकरच बरे होतील; राजेश टोपेंचा विश्वास
दरम्यान, या भागातील मच्छीमारांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. याबाबत फडणवीस यांनी पाजपंढरी येथे ग्रामस्थ, तसेच मच्छिमार बांधव यांच्याशी संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. त्यावेळी मच्छिमारांनी आपल्या व्यथा मांडल्या. एलईडी फिशिंगमुळे होणाऱ्या त्रासाचा प्रश्न उपस्थित केला गेला. फडणवीस यांनी याबाबत बोलताना सांगितले की, एलईडी मच्छिमारी जर कोणच्या संगनमताने होत असेल. तर ते खपवून घेतले जाणार नाही. असे सांगत त्यांनी मच्छीमारांना आश्वस्त केले.