रत्नागिरी- येत्या आठवड्याभरात महाशिवआघाडीचे सरकार बनायला काहीच हरकत नाही. पण, हे सरकार बनत असताना शिवसेनेचाच मुख्यमंत्री बनणार, हे नक्की असल्याचे संकेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंत गीते यांनी दिले आहेत. ते आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली.
सरकार बनवण्याच्या दृष्टीने शिवसेना पक्ष प्रमुखांची यशस्वी पाऊले पडत आहेत. महाराष्ट्राच्या सत्तेवरच्या रागापोटी शिवसेनेला राज्यसभेत आणि लोकसभेत वेगळी वागणूक मिळत आहे. एनडीएच्या घटकपक्षाला विरोधी पक्षात बसवण्याची एवढी घाई भाजपने करायला नको होती, असेही मत अनंत गीते यांनी व्यक्त केले.
काँग्रेससोबत सत्तास्थापनेचे अनंत गीते यांनी समर्थन केले. सत्तेची समीकरणाच्या दृष्टीने ती जुळवण्यासाठी काँग्रेसबरोबर जाणे योग्यच असल्याचा दावा अनंत गीते यांनी केला. राजकारणात जर तर ला काहीच महत्व नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अतिशय योग्य निर्णय घेतला आहे. दरम्यान, महाशिवआघाडीचा फॉर्म्युला अजून अंतिम झालेला नाही. त्यामुळे त्यावर चर्चा करणे योग्य नाही. फॉर्म्युला जेव्हा होईल त्यावेळी तो प्रसिध्द केला जाईल, असेही गीते यांनी सांगितले.
हेही वाचा- सव्वाशे वर्षांपासून कोकणात होतेय वाघ बचाव मोहीम... वाघ बारस दिवशीचा अनोखा उपक्रम