रत्नागिरी - राजापूर तालुक्यातील उन्हाळे येथील गंगातीर्थचा विकास सध्या थांबला आहे. हजारो भाविक या ठिकाणी येत असतात. मात्र, या ठिकाणी अनेक सोयीसुविधांचा अभाव पाहायला मिळतो. ट्रस्ट आणि ग्रामपंचायत यांच्यातील वादामुळे याठिकाणचा विकास रखडला आहे.
राजापूर जवळच्या उन्हाळे गावातील गंगा तीर्थक्षेत्र अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. राजापूरची गंगा ही गुढ मानली जात आहे. गंगा अवतरली की अनेकजण इथे दर्शनासाठी येत असतात. इथल्या गो-मुखातून हे गंगेचे पाणी येते. इथे असलेल्या गंगा कुंडात 10 नद्यांचे पाणी येत असल्याचे सांगितले जाते.
अशा गंगातीर्थाचा विकास आता ट्रस्ट आणि ग्रामपंचायत यांच्या वादात रखडला आहे. गंगातीर्थाची ख्याती जगभर पसरली आहे. पण, सध्या मात्र या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी कुंडांची अवस्था, इमारतीची अवस्थादेखील अत्यंत वाईट आहे. मात्र, ट्रस्ट या गंगातीर्थाच्या विकासासाठी सहकार्य करत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - निर्मला सीतारामन आपली जबाबदारी दुसऱ्यावर टाकू शकत नाहीत- अमित मित्रा
ट्रस्ट आणि ग्रामपंचायतीच्या वादात 2017 मध्ये मिळालेला 98 लाखांचा निधीदेखील मागे गेला. त्यामुळे गंगा तीर्थक्षेत्राच्या विकासावर त्याचा परिणाम जाणवत आहे. निसर्गसंपन्न अशा कोकणात पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात. त्यानंतर ते गंगेला देखील भेट देतात. पण, येथील सध्याची स्थिती मात्र अत्यंत दयनीय आहे. त्यामुळे पर्यटनावर भर देताना अशा क्षेत्रांचा विकास होणे आवश्यक आहे.