रत्नागिरी - महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे पंतप्रधान मोदींना समर्थन देण्याची भाषा करत आहेत. मात्र, त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे मराठा समाजाला मतदान पेटीतून सरकारला त्यांची जागा दाखवा, असे आवाहन करत वडिलांच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेत आहेत.
मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या युवकांना गृह खात्याने पुन्हा नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता समाजाने भूमिका घेतली पाहिजे. ५८ मोर्चे काढून यांना आपली ताकद दिसली नाही. आता जिथे-जिथे हे उभे आहेत. त्या-त्या ठिकाणी विरोधात मतदान करा. आमच्या विरोधात गेलात तर घरी बसावे लागेल, हे दाखवून द्या, असे आवाहन नितेश राणे यांनी मराठा समाजाला केले आहे. मराठा आंदोलकांना एक न्याय आणि मनोहर भिडे यांना एक न्याय का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे मोदींना पाठिंबा देण्याची भाषा करतात. तर दुसरीकडे त्यांचा मुलगा नितेश राणे मोदी सरकारच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन करतात. यामुळे राणे कुटुंबात नेमके काय चालले आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.