राजापूर (रत्नागिरी) - मोर्चाला संबोधित करताना नितेश राणे म्हणाले की राजापूरमध्ये रिफायनरी समर्थनाचा मोर्चा आपण काढतो आहोत. रिफायनरीच्या विरोधाच्या बातम्या येत आहेत. मात्र समर्थकांचा आवाज बाहेर जात नाही. त्यासाठी हा प्रयत्न असल्याचे राणे म्हणाले. रिफायनरीला विरोध करणारे कोकणाबद्दल विचार करत नाहीत, असा आरोप यावेळी राणे यानी केला. पंतप्रधानांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच नारायण राणे यांचीही प्रकल्प व्हावा अशी इच्छा आहे. मात्र या प्रकल्पाचे समर्थक जोपर्यंत आपली ताकद दाखवत नाहीत, तोपर्यंत सरकारही विचार करु शकत नाही, असे सूचक वक्तव्य यावेळी नितेश राणे यांनी केले. ते म्हणाले की राज्य सरकारला प्रकल्प हवा आहे. मात्र तो कुणावरही धाकधपटशा करुन करता येणार नाही. त्यासाठी येथील प्रत्येकाला विश्वासात घ्यायचे आहे. सगळ्यांना विश्वासात घेऊनच प्रकल्प पुढे जाईल, अशी ग्वाहीही यावेळी राणे यांनी दिली. त्यासाठी लोकांनी एकजूट करण्याची गरजही राणे यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावरही राणे यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले की ज्या लोकाना विरोध करायचा आहे, ते या प्रकल्पाला विरोध करतील. त्यामध्ये उद्धव ठाकरे, विनायक राऊत आणि त्यांची टोळी आहे. मात्र या टोळीला उभे करुन घेऊ नका, असा सल्ला नितेश राणे यांनी यावेळी दिला. मातोश्रीवर खोके पोहोचावे यासाठी ठाकरे रिफायनरीला विरोध करत असल्याचा आरोपही यावेळी राणे यांनी केला. मात्र कोकणात दलालांना येऊ द्यायचे नाही, असा विचार करुन रिफायनरी समर्थकानी एकत्र यावे असे राणे यावेळी म्हणाले. यावेळी कार्यकर्त्यांनी तसेच रिफायनरी समर्थकांनी, 'ग्रीन रिफायनरी झालीच पाहिजे' अशा घोषणाही दिल्या.
यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनीही रिफायनरी समर्थकांची बाजू मांडली. रिफायनरी हवी आहे का नाही यासाठी विचार झाला पाहिजे, असे ते म्हणाले. रिफायनरी समर्थनाची बाजू मीडियामध्ये आली नाही. देशासमोर आली नाही. रिफायनरी समर्थनासाठी आपण उभे राहणार आहोत. यासाठी कुणाच्या वेगळ्या नेतृत्वाची गरज नाही असे ते म्हणाले. राणे पुढे म्हणाले की, आपल्याला असे वाटते की रिफायनरी आली पाहिजे. त्यामुळे तरुणांना रोजगार मिळेल. यातून विविध जोडधंदे निर्माण व्हावेत. त्यामुळे तरुणांना नवी दिशा देणारी रिफायनरी झाली पाहिजे. तरुणांना पर्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी रिफायनरी झाली पाहिजे अशी भूमिका ठामपणे मांडली पाहिजे असे ते म्हणाले. खरे तर उद्धव ठाकरेंनी पत्र लिहून बारसूला जमिन हवी आहे असे पंतप्रधानांना कळवले होते. मात्र आज तेच इकडे येऊन रिफायनरीच्या विरोधात आंदोलन करत आहेत हे योग्य नाही. बाहेरून येऊन विरोध होत असेल तर तो हाणून पाडला पाहिजे असेही राणे म्हणाले.