रत्नागिरी - निसर्ग चक्रीवादळामुळे दापोली, मंडणगडमध्ये बागायतदारांना मोठा फटका बसला आहे. आंबा-काजू, नारळ-पोफळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. या बागायतींच्या नुकसानाचा आकडा जवळपास 3 हजार कोटींच्या घरात आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील साडेपाच हजार हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यातील जवळपास 95 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान हे दापोली आणि मंडणगड तालुक्यात झाले आहे. अनेक वर्षे पोटच्या मुलांप्रमाणे वाढवलेली हजारो झाडे जमीनदोस्त झाली. ज्या आंबा-काजू, नारळ-पोफळीवर पूर्ण कुटुंब पोसलं जायचं ती झाडंच या वादळात उन्मळून पडली आहेत. 20 हजार शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे.
सध्या नुकसानाचे पंचनामे जवळपास पूर्ण होत आले आहेत. मात्र या वादळाचा सर्वाधिक फटका आंबा बागायतींना बसला आहे. 3 हजार हेक्टर क्षेत्रातील आंबा बागायती जमीनदोस्त झाल्या आहेत. तसेच 1600 हेक्टरमधील काजूचे नुकसान झाले आहे. नारळ-पोफळीचे जवळपास 800 हेक्टर क्षेत्रातील नुकसान झाले आहे. असे जवळपास साडेपाच हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले असून हा नुकसानाचा आकडा जवळपास 3 हजार कोटींच्या घरात आहे. कृषी विभागानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र अजून अंतिम अहवाल तयार व्हायचा आहे. त्यामुळे हा आकडा अजून वाढण्याचीही शक्यता आहे.
बागायतीचे नुकसान पाहता, मदत मात्र तोकडी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बागायती पुन्हा उभ्या करायच्या असतील, तर त्यासाठी ठोस उपाययोजना सरकारने करणे आवश्यक आहे.