रत्नागिरी - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज (मंगळवार) आणखी 9 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 493 वर पोहोचली आहे, तर आणखी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 23 झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या दिड महिन्यापासून सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्याबाहेरून आलेल्या व्यक्तींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. दरम्यान, आज नव्याने नऊ रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. यात दापोलीतील दोन, संगमेश्वरमधील तीन, लांजामधील एक, रत्नागिरी तालुक्यातील एक, तर एक रुग्ण पश्चिम बंगालमधून रत्नागिरीत आला होता. त्याचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 493 झाली आहे.
विशेष म्हणजे एप्रिल महिन्याच्या शेवटी कोरोना बाधितांची संख्या शून्यावर आली होती. मात्र, 2 मे पासून ही संख्या झपाट्याने वाढली. आता केव्हाही 500 चा आकडा पार होईल, अशी स्थिती आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात आणखी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. चिपळूणमधील 72 वर्षीय वृद्धाचा, तर खेडमधील 44 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजपर्यंत एकूण 23 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 358 जण कोरोनातून बरे झाले आहेत. आता जिल्ह्यात एकूण 113 अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.