रत्नागिरी - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार माजी खासदार निलेश राणे यांनी आज (मंगळवारी) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जाहीर सभेमुळे त्यांनी शक्तिप्रदर्शन न करता निवडक कार्यकर्त्याना व कुटुबियांना घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.राणेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी होईल, असा अंदाज वर्तविण्यात आल्याने ठिकठिकाणी पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. अनेक कार्यकर्त्यांनी आदल्या दिवसापासूनच रत्नागिरीत तळ ठोकला होता. हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते रत्नागिरीत आले होते.
सकाळी ११ च्या सुमारास राणे कुटुंबीय आणि पक्षातील प्रमुख पदाधिकारी रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरीच्या दर्शनासाठी गेले होते. श्री देव भैरीला साकडं घालून सर्वजण जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. या ठिकाणी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून निलेश राणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळीमहाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष व खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत आणि निवडक पदाधिकारी उपस्थित होते.