रत्नागिरी - राज्यातील सरकार हे उद्धव ठाकरेंचे ( Uddhav Thackeray Government ) सरकार आहे, अजित पवारांचे ( Ajit Pawar ) नाही, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole Statement On Ajit Pawar ) यांनी दिली आहे. नेमकं सरकार कोण चालवते आहे, याबाबत विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी हे उत्तर दिले. तसेच निधीबाबत आम्ही योग्य व्यक्तीकडे न्याय मागितलेला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. रत्नागिरी येथे आयोजित ओबीसींच्या प्रश्नांवरून हल्लाबोल आंदोलनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
'ठराविक टाईम बॉन्डमध्ये चौकशी झाली पाहिजे' -
घोटाळे करण्याची मालिका कोणी सुरू केली, असा सवाल करत नाना पटोले यांनी सध्याच्या आरोप-प्रत्यारोपांना उत्तर न देता बगल दिली. भुंकणाऱ्या कुत्र्यांच्या तोंडी आपण लागत नाही, याचा अर्थ मी कुणाला कुत्रा म्हटलं असं होत नाही, असं म्हणत नाना पटोले यांनी अप्रत्यक्षपणे आपला रोख भाजप नेते किरीट सोमैया यांच्याकडे ठेवल्याचे दिसून आलं. किरीट सोमैया यांनी कोर्लई गावात जाऊन आज जी पाहणी केली. त्यात यांना मुख्यमंत्र्यांची घर दिसली का, अशा चिमटादेखील काढत नाना पटोले यांनी संजय राऊत यांचं समर्थन केलं. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. ठराविक टाईम बॉन्ड मध्ये ही चौकशी झाली पाहिजे, असे देखील नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.