रत्नागिरी - जिल्हा पोलीस कल्याण निधीच्या मदतीकरता "रत्नागिरी जिल्हा पोलीस दल" यांच्यामार्फत बहारदार "संगीत रजनी"चे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी १५ फेब्रुवारी रोजी चिपळूण येथील पवन तलाव येथे ६.३० वाजता, तर रत्नागिरी पोलीस ग्राऊंड येथे रविवारी १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता "संगीत रजनी" सादर होणार आहे.
महाराष्ट्रातील २ दिग्गज गायक कलाकार अवधूत गुप्ते व स्वप्नील बांदोडकर यांच्या धमाकेदार सादरीकरणाने ही संगीत रजनी रंगणार आहे. याचबरोबर "सुर नवा ध्यास नवा" फेम सध्याची लोकप्रिय गायिका जुईली जोगळेकर हिच्या सुरांबरोबर, आघाडीची नृत्यांगना सुवर्णा काळे हिचा अप्रतिम नृत्याविष्कारही रसिकांना "संगीत रजनी"मध्ये पहायला मिळणार असल्याची माहिती रत्नागिरीचे पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली आहे. "मँगो इव्हेंटस"तर्फे या "संगीत रजनी" सूत्रबद्ध नियोजन करण्यात येत आहे.

"सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" हे ब्रीदवाक्य घेऊन पोलीस दलातील प्रत्येक कर्मचारी आपले कर्तव्य अहोरात्र पार पडत असतो. राज्याच्या कायद्याची अंमलबजावणी करणारा एक महत्वपूर्ण घटक म्हणून पोलिसांकडे पाहिले जाते. नियम कायदे यांचे पालन करून समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांकडून केले जाते. अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांच्या व त्यांच्या कुटुंबियांनाही अनेक समस्या भेडसावत असतात. हे जाणून व त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी, तसेच पोलीस व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने १९८० साली "महाराष्ट्र पोलीस कल्याण निधी"ची स्थापना करण्यात आली. या पोलीस कल्याण निधीमधून पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या गरजा पुरविणे, आर्थिक मदतीबरोबरच आवश्यक साधन-सुविधा पुरविणे, विविध कल्याणकारी योजना राबविणे इत्यादी उपक्रम राबविण्यात येतात.
रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांसाठी जिल्हा पोलीस कल्याण निधीमार्फत अनेक कल्याणकारी योजना मांडून अंमलात आणल्या गेल्या आहेत. पोलिसांसाठी सेवा, आरोग्य, शिक्षण, निवास, आर्थिक सक्षमता, व्यक्तिमत्व विकास, व्यावसायिक कार्यकौशल्य, अशा विविध उपक्रमांद्वारे पोलिसांचे राहणीमान उंचावण्यासाठी त्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रामाणिक प्रयत्न होत असतात. याच प्रामाणिक हेतूने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने पोलीस कल्याण निधी उभारण्यासाठी "संगीत रजनी" या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे चिपळूण व रत्नागिरीमध्ये आयोजन करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे लोकप्रिय गायक अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर यांचा चिपळूणमध्ये प्रथमच कार्यक्रम होत आहे. "संगीत रजनी" भव्य-दिव्य स्वरूपात सादर होणार असून ओम साई डेकोरेटर्सचा भव्य रंगमंच, स्टेज व प्रेक्षकांत भव्य एलईडी स्क्रीन, तर प्रोफेशनल स्टेज लाईट्सनी रंगमंच उजळणार आहे. याचबरोबर महाराष्ट्रातील नामवंत वादक कलावंत रितेश ओहोळ, अमृता ठाकूरदेसाई, सुमित सरफरे, नितीन डोळे यांच्यासह रत्नागिरीतील वादक व गायक कलावंतांचीही साथ लाभणार आहे. पोलीस दलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलाच्या या उपक्रमामध्ये रत्नागिरीकरांनी बहुसंख्येने सहभागी होऊन तिकीट घेऊन बहुमोल प्रतिसाद द्यावा, असे आवाहन रत्नागिरी पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले आहे.