रत्नागिरी - 'नाणार रिफायनरी विषय संपलेला आहे, तो कोणीही पुन्हा उकरून काढू शकत नाही, ही शिवसेनेची स्पष्ट भूमिका आहे.' असे खासदार विनायक राऊत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. आज (बुधवार) रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
खा. राऊत म्हणाले, 'जे शिवसैनिक दुर्दैवाने जमीनमालक असतील तेच प्रकल्पाची मागणी करत असल्याने त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. दलाली करणाऱ्यांमध्ये दुर्दैवाने शिवसैनिक असतील तर त्या दलालांच्या आरडाओरडीकडे सुद्धा शिवसेना पक्षप्रमुख बिलकूल लक्ष देणार नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीत सुद्धा स्पष्ट आहे की, रिफायनरीन प्रकल्प रद्द करावा अशीच स्थानिकांची मागणी आहे. जनतेच्या या मागणीनुसारच मुख्यमंत्र्यांनी रिफायनरीची नोटिफिकेशन रद्द केली आहे. जोपर्यंत स्थानिक जनता हा विषय मांडत नाही, तोपर्यंत हा विषय संपलेला आहे, हाच मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीचा अर्थ होता.' असे खासदार विनायक राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात विघातक प्रकल्प केव्हाच येणार नसल्याचेही राऊतांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा - राज्याच्या इतिहासात सर्वाधिक काळ घरात राहणारे मुख्यमंत्री, भाजपचा टोला