रत्नागिरी - जिल्ह्यात पुरेसे बेड उपलब्ध आहेत, मात्र काहीजण कोणतीही माहिती नसताना टिकाटिप्पणी करीत आहेत. एसीत बसून बोलणे सोपे आहे, असा टोला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना लगावला आहे. शनिवारी ऑनलाईन झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ऑक्सिजन बेडची तरतूद, ३५० रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध-
यावेळी सामंत म्हणाले की, जिल्ह्यात सद्यस्थितीला ३०५२ बेड उपलब्ध असून त्यापैकी डीसीएच ५४९, डीसीएससी ५७४, सीसीसी १८८४ बेडची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी ७३ बेड ऑक्सिजनचे आहेत. जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता भासणार नाही, असे सांगून ३५० इंजेक्शन सध्या उपलब्ध आहेत, आवश्यकतेनुसार जिल्हाधिकार्यांकडूनच हे इंजेक्शन उपलब्ध होणार असल्याची माहिती सामंत यांनी यावेळी दिली.
लसीकरणाचा लाखाचा टप्पा पार
लसीकरणाबाबत माहिती देताना सामंत यांनी सांगितले की, जिल्ह्यात १ लाख ३५ हजार ३९ जणांचे लसीकरण झाले आहे. त्यापैकी १ लाख १४ हजार २४४ व्यक्तींनी पहिला डोस तर ३०७४५ जणांनी दुसरा डोस घेतला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले.
नवीन २५ व्हेंटिलेटर उपलब्ध करून देणार -
२० ते ३० वयोगटातील तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात बाधित होऊन कम्युनिटी स्प्रेड सुरू झाल्याची भीती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे. वाढती रूग्णसंख्या डोळ्यासमोर ठेवून नवीन २५ व्हेंटिलेटर उपलब्ध करून देणार असल्याची माहितीही मंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली.