रत्नागिरी - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका राज्याच्या अन्य भागांप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यालाही बसला आहे. फक्त एप्रिल महिन्यात तब्बल दहा हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी करोनाच्या पहिल्या लाटेत रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या काही हजारांपर्यंत मर्यादित राहिली होती. मात्र, मार्चपासून ही संख्या हळूहळू वाढू लागली आणि एप्रिल महिन्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येने नवीन उच्चांक प्रस्थापित केला आहे.
रुग्णसंख्या कशाप्रकारे वाढली?
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८ एप्रिलपर्यंत नवीन बाधितांची संख्या दररोज सुमारे १०० ते १५० ने वाढत होती. मात्र, ९ एप्रिलला सुमारे शंभराने वाढून २५१ झाली. त्यानंतर जेमतेम ४ दिवस रुग्णसंख्या २०० ते २५०पर्यंत मर्यादित राहिली होती. मात्र, १३ व १४ एप्रिल रोजी ३००च्यापुढे गेली आणि १५ एप्रिलला रुग्णसंख्येने ४०० चा टप्पा (४१७) ओलांडला. त्यापुढील तीन दिवस वेगाने ही संख्या पाचशेवर (१८ एप्रिल - ५५५) गेली. १९ एप्रिलला त्यात तात्पुरती घट (२५९) दिसली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी (२० एप्रिल) हा आकडा सहाशेवर (६८५) पोहोचला. त्यानंतरचे चार दिवस जिल्ह्यात दररोज ४५० ते ५५० करोनाबाधित रुग्ण आढळून येत होते. २५ एप्रिल रोजी तो पुन्हा सहाशेवर (६१५) गेला. त्यानंतर एक दिवस वगळता जिल्ह्यात दररोज सहाशेपेक्षा जास्त बाधित रुग्ण आढळून येत आहेत. २८ तारखेला तर तब्बल ७९१ रुग्ण सापडल्याने दैनंदिन आकडेवारीचा नवा उच्चांक गाठला गेला आणि अवघ्या २८ दिवसात जिल्ह्यात नवीन १० हजार करोनाबाधितांची (१०,०४०) नोंद करण्यात आली.
हेही वाचा - पोलीस निरिक्षक पतीचा कोरोनाने मृत्यू, तिसऱ्याच दिवशी डॉक्टर पत्नी कामावर झाली रुजू
एप्रिल महिन्यात सर्वाधिक चाचण्या -
पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेमध्ये संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त आहे, हे या वाढीमागील मुख्य कारण आहे. मात्र, यासोबतच अनेक ठिकाणी अज्ञान, गैरसमज किंवा भितीपोटी संशयित रुग्ण चाचणीसाठी उशीरा जात असल्यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने चाचण्यांचे प्रमाण वाढवल्यामुळेही रुग्ण निष्पन्न होण्याचे प्रमाण वाढले आहे.
जिल्ह्यात सध्या 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम पुन्हा एकदा राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन तपासणी करत आहेत. जिल्ह्यातील करोनाची लाट नियंत्रणात आणण्यासाठी या मोहिमेचा चांगला उपयोग होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा - गोव्यात ऑक्सिजन अभावी २६ कोरोना रुग्णांचा बळी; टँकर चालक नसल्याने ऑक्सिजन तुटवडा