रत्नागिरी - मान्सून केरळच्या उंबरठ्यावर असून राज्यातही त्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. हवामान खात्याप्रमाणे या मच्छिमार देखील पावसाचा अंदाज सांगत असतात. मान्सून पुढच्या आठवड्यात कोकणात दाखल होणार, असा अंदाज यावेळी मच्छिमारांनी वर्तवला आहे.
मान्सून महाराष्ट्रात कधी सक्रीय होणार याचा अंदाज हवामान खाते बांधत असते, पण पाऊस कधी येणार याचे अचूक ठोकताळे किनारपट्टीवरचा मच्छिमारही बांधत असतो. हवामान खात्याचा अंदाज एकवेळ चुकेल मात्र या मच्छिमाराचा अंदाज चुकत नाही, असे म्हटले जाते.
सध्या कोकणातल्या समुद्राचा निळा क्षार रंग बदलून तो लालसर झाला आहे. समुद्रातील लाटांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या दक्षिणेकडून वाऱ्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पुढील आठवड्याभरात मान्सून सक्रीय होईल, असा ठोकताळा कोकण किनारपट्टीवरचे मच्छिमार बांधत आहेत.
कशाच्या आधारावर मच्छिमार ठोकताळे बांधतात?
मच्छिमार कोकणात समुद्राच्या लाटांवर येणाऱ्या फेसावरून मान्सून कधी येणार हे ओळखतात. समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटेतून मातीच्या रंगाचे पाणी येते. रंगाच्या पाण्याला जो फेस येतो त्याला फेणी असे म्हटले जाते. सध्या किनाऱ्यावर फेणीचे पाणी आले आहे. केवळ मान्सून सक्रीय होण्याच्या आठ ते दहा दिवस आधी फेणीचे पाणी दिसते. समुद्राच्या निळ्याक्षार रंगात बदल होतो. मान्सून जवळ आला की हा रंग लालसर होतो. समुद्राच्या लाटा देखील आपल्या दिशा बदलतात. या सर्व गोष्टीवरून मच्छिमार अंदाज बांधतात.