रत्नागिरी - 'माझं कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेला सर्वांनी सहकार्य केले तर महाराष्ट्रात कोरोनामुक्त होणारा रत्नागिरी हा पहिला जिल्हा ठरेल, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. मोहिमेच्या अनुषंगाने माहिती घेण्यासाठी व त्याबाबतची चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्यासमवेत झूम ॲपद्वारे आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते.
मंत्री उदय सामंत यांनी यावेळी, ज्या रुग्णांना हॉस्पीटलमध्ये न जाता हॉटेलमध्ये क्वारंटाइन होण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी खासगी हॉटेल मध्ये बेडचे दर ठरवून पेड क्वारंटाइनची सुविधा तात्काळ सुरु करण्याचे निर्देश दिले. तसेच खेड नजीक खासगी हॉटेलमध्ये पेड क्वारंटाईन सुविधा सुरु करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. रत्नागिरीतील महिला रुग्णालयाचे काम सुरु असून रत्नागिरी महिला रुग्णालय पहिल्या तीन क्रमांकामध्ये आहे. रत्नागिरीसाठी लवकरच १५ अॅम्ब्यूलन्स मिळणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी इन्दुराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा शल्य चिकित्सक संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापुरकर यांच्यासह जिल्हयातील लोकप्रतिनिधी ऑनलाईन उपस्थित होते.
सामंत म्हणाले, कोरोनाने होणारा मृत्युदर कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेच आहे. त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत आपण करु. राज्य टास्क फोर्सच्या डॉक्टरांबरोबर येथील डॉक्टरांची बैठक घेण्याच्या सूचना देखील केल्या. आरोग्य विभागासंदर्भात पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. कोव्हीड सेंटर मध्ये रुग्णांला बघायला येणाऱ्या नातेवाईक आवश्यक ती काळजी घेत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
खासदार विनायक राऊत यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम यशस्वी करण्यासाठी आणि ग्रामपंचायत मधील प्रशासंकाचा ताण कमी करण्यासाठी पुर्वीच्या समित्या कार्यान्वीत करणे, प्रत्येक ग्रामपंचायतीला ब्रँडेड ऑक्सीमीटर देणे आवश्यक असल्याच मत व्यक्त केले. तसेच कोव्हीड 19 प्रतिबंध करण्यासाठी रत्नागिरी, चिपळूण यासारख्या बाजारपेठांनी स्वत:चा कर्फ्यु लावणे गरजेच असल्याचे सांगितले. वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करुन बीएएमएस डॉक्टर भरण्यासाठी प्रयत्न करावेत अशा देखील सूचना केल्या.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिमंतर्गत 8 लाख 84 हजार जणांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून यामध्ये 69 हजार 900 कोमोटिव्ह पेशन्ट सापडले असून 598 जणांच्या ॲन्टीजेन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 114 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याची माहिती यावेळी दिली.