रत्नागिरी - सध्या संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना आजाराबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. जेणेकरुन नागरिकांमध्ये या आजाराबाबत असणारे गैरसमज दूर होतील, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 31 मार्चपर्यंतचे महाविद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रम पुढे ढकलण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कोरोना वायरस जागृती संदर्भात आढावा बैठकीत सामंत बोलत होते. कोरोना संदर्भात जिल्ह्यात जनजागृती करण्यात येत असून, यामध्ये गर्दीच्या ठिकाणी, बसस्थानक, रेल्वेस्थानक, आठवडा बाजार इत्यादी ठिकाणी जिंगल्स तसेच फ्लेक्सच्या माध्यमातून जनजागृती करण्यात यावी, असे निर्देश सामंत यांनी दिले. शालेय तसेच ग्रामीण पातळीवर देखील जनजागृती आवश्यक असून केंद्रप्रमुख, अंगणवाडी सेविका आदी संबंधितांना प्रशिक्षण देण्याच्या सूचना यावेळी सामंत यांनी केल्या. शाळा व महाविद्यालांमध्ये आयोजित करण्यात येणारे सार्वजनिक कार्यक्रम सध्या पुढे ढकलण्यासंदर्भात सूचना देण्यात याव्यात, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
कोरोना आजाराबाबत खातरजमा केल्याशिवाय सोशल मिडियावर कोणतीही पोस्ट अपलोड करु नये. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. राज्याच्या तापमानाचा विचार करता कोरोना आजार पसरण्याचा धोका कमी आहे. तसेच जिल्ह्यातील यंत्रणा सतर्क असल्याने नागरिकांनी कोरोना आजाराबाबत भिती बाळगू नये, असे आवाहन सामंत यांनी यावेळी केले.
जिल्ह्यात मास्कची विक्री जास्त दराने केल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. सॅनिटायझर अथवा साबणाचा वापर करुन हात स्वच्छ धुवणे आवश्यक आहे. स्वच्छ रुमालाचा वापर करुनही या आजाराचा धोका टाळू शकतो, अशी माहिती यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली. जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कोरोनाच्या संशयीत रुग्णाच्या चाचण्या निगेटिव्ह आल्याने सदर रुग्णाला कोरोनाची लागण झाली नाही. तसेच जिल्ह्यात सद्यस्थितीत एकही कोरोनाचा रुग्ण नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे, अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर, प्रातांधिकारी विकास सूर्यवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्री. माने, तहसिलदार शशिकांत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.