रत्नागिरी - स्वातंत्र्य संग्रामाचे जनक लोकमान्य टिळक म्हणजेच बाळ गंगाधर टिळक यांची आज (23 जुलै) 163 वी जयंती. टिळकांचा जन्म दीडशे वर्षांपूर्वी 23 जुलै 1856 मध्ये रत्नागिरीत झाला होता. आज त्यांच्या जयंतीनिमित्त गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय ते लोकमान्य टिळक स्मारक अशी अभिवादन यात्रा काढण्यात आली.
या विद्यार्थ्यांसह मान्यवरांनी लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत त्यांची आरती केली. टिळकांच्या कार्याचे स्मरण रहावे या मुख्य उद्देशाने येथे वेगवेगळे कार्यक्रम आज करण्यात आले. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संस्कृत गीतापठण केले. तसेच जीजीपीएसच्या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांवर एक गीत सादर केले..
रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती भागात टिळक आळीत टुमदार कोकणी घर असून जन्मानंतर टिळकांचे या घरांत सुमारे १० वर्षे वास्तव्य होते. टिळकांचे मूळ गाव दापोलीतील चिखलगाव हे होते. त्यावेळी लोकमान्यांचे वडील रत्नागिरीत शिक्षक म्हणून कामाला होते. इंदिराबाई गोरे यांच्या मूळच्या घरात टिळक कुटुंब भाड्याने राहात होते.
रत्नागिरीतील टिळक जन्माची ही वास्तू महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्त्व खात्याने जतन केली असून, तिला स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे.