रत्नागिरी - विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढत त्याला जीवनदान देण्यात वनविभागाला यश आलं आहे. संगमेश्वर तालुक्यातील देवधामापूर गावातल्या पाष्टेवाडीतील गणपत पाष्टे यांच्या विहीरीत रात्रीच्या सुमारास बिबट्या पडला होता. आज सकाळी विहिरीतून आवाज आल्याने पाष्टे यांनी विहिरीत डोकावले असता विहिरीत बिबट्या असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
पाष्टे यांच्या विहिरीला साडेतीन फुटाचा कठडा व जाळी लावलेली होती. मात्र बिबट्याने भक्ष्याचा पाठलाग करताना थेट जाळीवर उडी मारली. त्यामुळे जाळी तुटून तो 25 फुट पाणी असलेल्या विहीरीत कोसळला. आज सकाळी पाष्टे यांच्या ही घटना लक्षात आली.
विहिरीत बिबट्या पडल्याची खबर वाऱ्यासारखी परिसरात पसरली आणि बिबट्याला पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली.
दरम्यान, विहिरीत बिबट्या पडल्याची खबर संतोष पाल्ये यांनी देवरुख वनविभागाला दिली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या परीक्षेञ वनअधिकारी प्रियांका लगड, वनपाल सुरेश उपरे, वनरक्षक बाबु गावडे, शर्वरी कदम, मिलींद डाफळे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर विहिरीत पिंजरा सोडण्यात आला. ग्रामस्थांच्या सहकार्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या बिबट्याला सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर देवरुख येथे या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या बिबट्याला सुरक्षित अधिवासात सोडण्यात आलं. दरम्यान हा बिबट्या नर असून तो पाच वर्षाचा असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.