रत्नागिरी - फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना लांजा-कुंभारवाडी परिसरात घडली आहे. या ठिकाणी फासकी कोणी लावली याचा शोध वनविभागाकडून सुरू आहे.
ओढ्याजवळील झाडाला लावण्यात आली होती फासकी
लांजा कुंभारवाडी येथील पुरुषोत्तम आत्माराम कुंभार यांच्या शेतालगतच्या ओढ्याजवळील एका झाडाला शिकारीच्या उद्देशाने फासकी लावण्यात आली होती. या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी फासकीत अडकलेला मृत बिबट्या गुराख्यांना आढळून आल्याने ही घटना समोर आली आहे.
माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल
गुराख्यांनी या घटनेची माहिती वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी प्रियांका लगड, सागर पाताडे आणि विक्रांत कुंभार हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी फासकीत अडकलेल्या मृत बिबट्याला बाहेर काढले. त्यानंतर लांजाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कसाळकर यांनी या बिबट्याचे शवविच्छेदन केले.
बिबट्याचे वय अंदाजे 4 ते 5 वर्षे
मृत बिबट्या मादी बिबट्या असून, हा बिबट्या अंदाजे 4 ते 5 वर्षांचा असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी फासकी कोणी लावली, याचा शोध घेऊन दोषींवर कारवाई करण्यात येईल असेही वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
हेही वाचा - पतीच्या स्मरणार्थ पत्नीने बांधला ताजमहाल..
हेही वाचा - लोकशाहीची थट्टा! उपसरपंचपदासाठी चक्क १० लाख ५० हजारांची बोली; व्हिडिओ व्हायरल