रत्नागिरी - विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे इथे घडली आहे. वनविभागाने मृत बिबट्याला विहिरीतून बाहेर काढून पंचनामा केला आहे. मात्र हा बिबट्या विहिरीत कसा पडला, याची चौकशी करणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.
मावळंगे बौद्धवाडी येथील अजय सखाराम जाधव यांच्या घराशेजारी असलेल्या विहिरीतून वास येत होता, म्हणून त्यांनी डोकावून पाहिले असता बिबट्या मृतावस्थेत दिसला. गुरुवारी दुपारी 4 च्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेची माहिती मावळंगे गावच्या सरपंच वैदेही गुळेकर यांनी वनविभागाला दिली. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी बिबट्याला विहिरीतून बाहेर काढून पंचनामा केला. यावेळी परिक्षेत्र वनअधिकारी प्रियंका लगड, वनपाल जी.पी. कांबळे, मिथाली कुबल, एम.जी. पाटील, नाखरे गावचे पोलीस पाटील सुधीर वाळिंबे आदी उपस्थित होते.
साधारणतः, दोन ते तीन दिवसांपूर्वी हा बिबट्या विहिरीत पडला असावा, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. नर जातीचा हा बिबट्या पूर्ण वाढ झालेला साधारण सहा वर्षांचा असावा. गेल्या काही दिवसांपूर्वी अनेक जणांवर बिबट्याने हल्ले केले होते. अलीकडे बरेच दिवस बिबट्याचा कुठे वावर नव्हता. त्यामुळे कदाचित मेलेल्या या बिबट्यानेच हल्ले केले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, हा बिबट्या विहिरीत कसा पडला, याची चौकशी केली जाईल, असे परिक्षेत्र वनाधिकारी प्रियंका लगड यांनी सांगितले आहे.
हेही वाचा- क्रांतीकारक सुखदेव यांचा बालभारतीला विसर; नाव वगळल्याने संतप्त प्रतिक्रिया