रत्नागिरी - गेल्या दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील मिरजोळे गावातील खालचापाट मधलीवाडी येथे भूस्खलन झाले आहे. 3 ते 4 एकर जमीन 20 ते 25 फुटांनी खचली आहे. त्यामुळे येथील भातशेती धोक्यात आली असून घरांनाही धोका निर्माण झाला आहे.
गेल्या 15 वर्षांपासून मिरजोळे खालचापाट मधलीवाडी परिसरात भूस्खलन होत आहे. यावर्षीही गेल्या दोन दिवसात शंभर फुट लांब भुसख्लन झाले. जमिनीचा मोठा भाग खचला आहे. त्यामुळे येथील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. याठिकाणी यापूर्वी 2006 मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले होते. त्यावेळी जवळपास 20 एकर जमीन एकाचवेळी खचली होती. त्यामुळे येथील शेती, बागायत देखील उद्धवस्त झाली आहे.
दरम्यान या ठिकाणी काँक्रीटचा धुपप्रतिबंधक बंधारासुद्धा बांधण्यात आला होता. पाटबंधारे खात्याने त्यावर लाखो रुपयांचा निधी खर्च केला. मात्र, सध्या होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा सुमारे 100 फूट लांब आणि 20 ते 25 फूट उंच जमीन खचलेली आहे. त्यामुळे शेतकरी भयभीत झालेत.
जमीनी खचत राहिल्यास त्यामुळे मोठा धोका निर्माण होणार आहे. नदीचा प्रवाह बदलल्याने भुसख्लन मोठ्या प्रमाणात होत आहे. या भुस्खलनामुळे शेतजमिनी धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.