रत्नागिरी - कोकण किनारपट्टीवरील क्यार चक्रीवादळाचा धोका सध्या टळला आहे. मात्र याचा मोठ्या प्रमाणात परिणाम मच्छिमारी व्यवसायावर झाला असून, वादळी परिस्थिती तसेच पावसामुळे गेल्या आठ दिवसांपासून मासेमारी ठप्प आहे. मासेमारी व्यवसायावर अवलंबून असणाऱया इतर जोडधंद्यांनाही यामुळे फटका बसला आहे.
गेल्या आठ दिवसांपासून बंद असलेल्या मासेमारीमुळे जवळपास 40 ते 50 कोटींचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील विविध बंदरात उभ्या असलेल्या साडेतीन हजाराहून अधिक होड्या वादळी परिस्थितीमुळे किनाऱ्यावर आश्रयाला आहेत.
अजून काही दिवस मच्छिमारीसाठी योग्य परिस्थिती नसल्याचा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आल्याने मच्छिमारांना होड्यांवरील कामगारांच्या वेतनाचा भुर्दंड बसला आहे. ऐन दिवाळीत मच्छिमारांचा रोजगार मंदावला असून, संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे मच्छिमार आर्थिक संकटात सापडला आहे.