रत्नागिरी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेकडून विदेशी प्रवाशांवर खास नजर ठेवण्यात येत आहे. खास करून चीन, दक्षिण कोरिया, इंग्लंड, स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनी या सात देशांमधून येऊन कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या विदेशी प्रवाशांची विशेष माहिती गोळा करण्यात येत आहे. असे विदेशी प्रवासी कोचमध्ये आढळल्यास त्यांचे नाव, देश, पासपोर्ट, त्यांचे राष्ट्रीयत्व, त्यांचा संपर्क क्रमांक तसेच हे प्रवासी या सात देशांपैकी कुठल्या देशामध्ये प्रवास करून आले आहेत का? याची माहिती घेतली जाते. तसेच असे प्रवासी जे या देशांपैकी एकाही देशाचे नागरिक नाहीत, पण ते या देशांना भेटी देऊन आले असतील तर अशा प्रवाशांची माहिती राज्य सरकारला दिली जाते, अशी माहिती कोकण रेल्वेचे क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक उपेंद्र शेंडये यांनी दिली आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. कोकण रेल्वेच्या सर्व गाड्यांमध्ये साफसफाई आणि निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. तसेच एसी कोचमधून ब्लँकेट आणि पडदे काढून टाकण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोकण रेल्वेने स्वतःच्या सर्व गाड्यांमध्ये स्वच्छता मोहिम राबवली आहे. सर्व गाड्यांमध्ये औषधांची फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे. त्याचबरोबर दरवाज्यांच्या मुठी आणि अन्य ठिकाणीही फवारणी करून निर्जंतुकीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. तसेच कोकण रेल्वे मार्गावर 022-27561721 हा हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे.
कोकण रेल्वेत काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला सॅनिटायझर्स आणि मास्क देण्यात आले आहेत. कोरोनाबाबत जनजागृती करणारे पोस्टर्स रेल्वेस्थानकावर लावण्यात आले असून प्लॅटफॉर्मवरही कोरोनाबाबत सावधानता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कोरोनाबाधित आणि संशयित रुग्णांच्या देखरेखीसाठी रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये 28 खाटांचे आयसुलेशन वार्ड सज्ज ठेवण्यात आले आहे.