रत्नागिरी- बारावीच्या निकालामध्ये पुन्हा एकदा कोकण बोर्डाने बाजी मारली आहे. कोकण बोर्ड सलग आठव्यांदा अव्वल क्रमांकावर राहिला आहे. कोकण बोर्डाचा निकाल यावर्षी ९३.२४ टक्के लागला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता जाहीर झाला. या निकालामध्ये राज्यातील एकूण ९ विभागीय मंडळांमध्ये कोकण बोर्डाचा सर्वाधिक ९३.२३ टक्के एवढा निकाल लागला आहे. याखेरीज कोकण बोर्डाअंतर्गत येणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९४.२९ टक्के तर रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल ९२.६५ टक्के एवढा लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक असल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.
कोकण विभागीय मंडळाच्या विभागीय सचिव भावना राजनोर, जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास कुलाल यांच्या उपस्थितीत कोकण बोर्डाचा १२ वी चा ऑनलाईन निकाल पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला. या निकालानुसार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातून १२ वी साठी ३१ हजार ७६४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी २९ हजार ६१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील २० हजार ६३४ विद्यार्थ्यांपैकी १९ हजार ११७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९२.६५ टक्के निकाल लागला. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ११ हजार १३० विद्यार्थ्यांपैकी १० हजार ४९५ म्हणजेच ९४.२९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५५ टक्के असून मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.०९ टक्के आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.५९ तर मुलींच्या उत्तीर्णतेचे टक्केवारी ९७.११ टक्के एवढी आहे. दोन्ही जिल्ह्यात मिळून कोकण बोर्डात मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.४५ तर मुलांची ९०.२५ टक्के एवढी आहे. मुलींच्या उर्त्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा ६.२ टक्के अधिक असल्याचे स्पष्ट होते.
निकालामध्ये वाणिज्य शाखेचा निकाल सर्वाधिक ९७.२३ टक्के लागला असून त्या खालोखाल विज्ञान शाखा ९५.३१ टक्के, व्यावसायिक विषयक शाखा ८९.४४ टक्के, तर कला शाखेचा निकाल ८५.७८ टक्के लागला आहे. चारही शाखांच्या निकालात रत्नागिरीपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.