रत्नागिरी - ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर अडीच हजार मराठी कामगारांच्या रोजगाराशी संबंधित असलेले 'खंबाटा एव्हिएशन’ प्रकरण खासदार विनायक राऊत यांना भोवण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण 'खंबाटा एव्हिएशन’ बंद झाल्यानंतर देशोधडीला लागलेले कोकणातील जवळपास ७० टक्के कामगार आता खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात उभे ठाकलेत. हे कामगार कोकणात विनायक राऊत यांच्या विरोधात घरोघरी जाऊन प्रचार करणार आहेत.
रत्नागिरीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून झालेल्या पत्रकार परिषदेत कामगारांनी आपली ही भूमिका स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेला सुनिल तळेकर, विश्वनाथ दळवी आदी कामागारांसह माजी खासदार निलेश राणेदेखील उपस्थित होते. आपण या कामगारांच्या पाठीशी असल्याचे राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.
'मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी फक्त शिवसेना' गळा काढणारी शिवसेना पुन्हा एकदा याच मुद्यावरून वादात सापडली आहे. हा वाद निवडणुकीत सेनेला भोवणार, अशी चिन्हे दिसत आहेत. मुंबईतल्या आंतराष्ट्रीय विमानतळावर ग्राऊंड हॅडलिंगचे काम करणाऱ्या या कंपनीत २ हजार ७६३ कामगार होते. यातील जवळपास ७० टक्के कामगार हे मराठी आणि विशेषतः कोकणातील आहेत. खंबाटा एव्हिएशनमध्ये भारतीय कामगार सेना ही मान्यतापात्र युनियन होती. त्या युनिटची जबाबदारी खासदार विनायक राऊत यांच्यावर होती. दोन वर्षापूर्वी ही कंपनी बंद पडली. यातील कामगारांना वर्षभर पगार मिळाले नाहीत. आता या कंपनीतील कामगार देशोधडीला लागलेत. ही कंपनी बंद पडायला खासदार विनायक राऊत हेच जवाबदार असल्याचा आरोप रत्नागिरीत पत्रकार परिषद घेत या खंबाटा एव्हिएशन कंपनीतील कामगारांनी केला.
या कंपनीतील कामगार सेनेच्या युनियनमधील युनिटची जवाबदारी खासदार राऊत यांच्याकडे होती. त्यामुळे कंपनी अचानक बंद झाल्यानंतर खासदार विनायक राऊत यांनी आपली जवाबदारी वेळोवेळी झटकली. तसेच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीसुद्धा आपली आश्वासने पाळली नाहीत. त्यामुळे आज कामगारांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. जो मराठी माणसाला न्याय देवू शकला नाही, ज्याच्यामुळे मराठी माणसांचे संसार उद्धस्थ झाले तो मराठी माणसाला रोजगार काय देणार असा सवाल खंबाटी एव्हिएशनमधील कामगारांनी उपस्थित केला आहे.
यावेळी खंबाटा प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचा पुरावा दाखवत निलेश राणे यांनी खंबाटा एव्हिएशन कंपनी बंद होण्यामागे भ्रष्टाचार असल्याचा आरोप केला.