रत्नागिरी - जयगडमधून मासेमारीसाठी गेलेली नावेद 2 ही नौका गेले 15 दिवस बेपत्ता आहे. या बोटीवर एकूण 7 खलाशी होते. दरम्यान या बोटीचा अपघातच झाला असून याला जिंदाल कंपनीचे जहाज जबाबदार असल्याचं मच्छिमार बांधवांंचे म्हणणे आहे. याबाबत जयगड येथील मच्छिमार बशीर होडेकर यांनी सांगितले, की कंपनीशी बैठकही झाली, मात्र त्यांच्याकडून मिळणारी उत्तरे ही समाधानकारक नव्हती. त्यामुळे बेपत्ता खलाशी तसेच बोटमालकाला न्याय मिळावा, अशी मागणी आम्ही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
मंत्री महोदयांनी कंपनीला याची दखल घेण्यास सांगितलं असल्याचं होडेकर यांनी सांगितले. तसेच आम्हाला जर समाधानकारक न्याय मिळाला नाही तर आंदोलन करणार असल्याचे होडेकर यांनी सांगितले. दरम्यान या बेपत्ता खलाशांचा मृत्यू घोषित व्हावा, त्यांना आर्थिक मदत मिळावी, अशी आपली मागणी असल्याचे वेळणेश्वर जिल्हा परिषद गटाच्या सदस्या नेत्रा ठाकूर यांनी सांगितले आहे.